राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा डंका सातत्याने वाजवला जात असला तरी शैक्षणिकदृष्ट्या मात्र महाराष्ट्र आता १० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
राज्य शैक्षणिक दर्जाबाबत आता दहाव्या क्रमांकावर आहे. तर शैक्षणिक गुणवत्तेच्याबाबतीत राजस्थान देशपातळीवर तिसरा आणि मध्यप्रदेश पाचव्या स्थानांवर पोहचला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेच्या एनसीईआरटी नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीईआरटी मार्फत देशातील विविध राज्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. महाराष्ट्र आता १० व्या क्रमांकावर फेकला गेला ( Maharashtra Ranks 10th in NCERT Report ) आहे. तर अन्य राज्यांनी अनपेक्षितरित्या प्रगती केल्याची माहिती एनसीईआरटीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्ट झाली असून ही बाब चिंताजनक असल्याचे राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले.
कसे केले जाते सर्वेक्षण ? २०२१ मध्ये २७ राज्ये आणि केंद्र प्रदेशातील १ लाख १८ हजार २७४ शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीमधील ३४ लाख १ हजार १५८ विद्यार्थी आणि ५ लाख २६ हजार ८१४ शिक्षकांशी संपर्क करून हा अहवाल तयार करण्यात आला होता. या सर्वेक्षणात भाषा, गणित आणि पर्यावरण विषयांवर आधारीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरून विविध राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार देशात पंजाबने पहिला क्रमांक पटकाला आहे.
कोणत्या राज्याला किती गुण ? एनसीईआरटीच्या गुणवत्तेनुसार पंजाबला ५९.३८ टक्के गुण मिळाले आहेत. तर चंदीगड ५५.१३, राजस्थान ५४.८३, जम्मू-काश्मीर ५०.३०, मध्यप्रदेश ४९.९८, पोंडीचेरी ४९.९३, मणीपुर ४९.४५, हरियाणा ४९.४०, पश्चिम बंगाल ४९.३५, महाराष्ट्र ४९.०५, केरळ ४८.७८, गुजरात ४७.९८, गोवा ४७.७८, ओरिसा ४७.५५, आसाम ४७.४३, लक्षदीप ४७.००, अंदमान आणि निकोबार ४६.८३, कर्नाटक ४५.५५, दिल्ली ४५.७३, लडाख ४५.७०, सिक्कीम ४५.६०, हिमाचल प्रदेश ४५.५०, बिहार ४५.२८, झारखंड ४४.८०, नागालँड ४४.५०, त्रिपुरा ४४.४०, तामिळनाडू ४३.६३, दमण आणि दिव ४३.६३,आंध्र प्रदेश ४२.५५, मिझोरम ४३.५०, उत्तर प्रदेश ४३.२५, उत्तराखंड ४२.७०, अरुणाचल प्रदेश ४२.५३, छत्तीसगड ४०.५५, तेलंगणा ३९.५३, दादरा आणि नगर हवेली ३९.२८ आणि मेघालयला ३८.८८ टक्के गुण मिळाले आहेत, अशी माहितीही शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा