अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदविका प्रवेशप्रक्रिया जाहीर....
अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून; अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला होणार प्रदर्शित... (diploma admission)
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वास्तूकला प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवारपासून ता. २९ मे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तूकला पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशासाठी ई-स्क्रूटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटीनी याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 'कॅप' अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तसेच 'कॅप'व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे, या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ) सुरू ठेवल्या जाणार आहेत.
प्रत्यक्ष स्क्रूटीनी पद्धतीसाठी सुविधा केंद्रांची यादी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही केंद्रे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
राज्यमंडळामार्फत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना शैक्षणिक पात्रता तपशीलात स्वतःचा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा, राज्य मंडळातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले गुण राज्य मंडळाकडून थेट घेण्यात येतील आणि ते संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येतील.
प्रवेशाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे
ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.
कालावधी
२९ मे ते २५ जून
कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे
२९ मे ते २५ जून
विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २७ जून
तात्पुरत्या यादीवर तक्रार व हरकती नोंदविणे २८ ते ३० जून
अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २ जुलै
अर्ज सादर करण्यासाठी सुविधा -
संकेतस्थळ :
https://poly24.dtemaharashtra.gov.in/
- मोबाइलवर 'DTE Diploma Admission' हे अॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येईल
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.