डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महाराष्ट्रात लवकरच शिक्षक भरती

 

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची  भरती होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती सभागृहात दिली.



राज्यातील पात्रता  धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती. परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.

आमदार राजेश एकडे आणि इतरांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली.



शिक्षण सेवक मानधनाबाबत महत्त्वाचे

 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला गेला आहे. यानंतर त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल. नव्या प्रस्तावानुसार, प्राथमिक-उच्च प्राथमिक स्तरावर शिक्षण सेवकांना 16 हजार, माध्यमिक पातळीवर 18 हजार तर, उच्च माध्यमिकसाठी 20 हजार इतकं मानधन मिळणार आहे.

मानधन वाढीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे



शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीबाबत राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी आहे. या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळेल आणि शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीचा मार्ग मोकळा होईल. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना तसेच शिक्षण सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला आणला होता. परंतु त्याच्यावर विचार झाला नव्हता.

उच्च न्यायालयाकडून मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त

उच्च न्यायालयानेदेखील एक निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. शिक्षक संघटनांनी मानधन वाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार मानधन वाढीची मागणी केली होती. प्राथमिक, उच्च प्राथमिकसाठी 20 हजार, माध्यमिकसाठी 25 हजार तर उच्च माध्यमिकसाठी 30 हजार रूपये इतकी मागणी केली होती.

दरम्यान, राज्यात सध्या शिक्षण सेवकांची संख्या 12 हजारांच्या आसपास आहे. तर 40 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची मागणीही होत आहे.


शालेय शिक्षणमंत्री राजस्थान दौऱ्यावर

 शिक्षण मंत्री दीपक केसरकर  हे राजस्थानची शिक्षणातील प्रगती जाणून घेण्यासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत.



शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेवर पालक, शिक्षक, शिक्षण तज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, डॉक्टर या सगळ्यांनी टीका केली. मुलांच्या आणि पालकांच्या मनावर रोजच्या अभ्यासामुळे आणि कालबाह्य परीक्षा पद्धतीमुळे जे मानसिक आणि बौद्धिक ओझं निर्माण होतं, ते आधी कमी करायला हवं, अशी मागणी त्यावेळेला केली गेली होती. या मागणी नंतर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला होता की, त्याबद्दल निर्णय अजून व्हायचा आहे. 

राजस्थान मधील शिक्षण देशात उत्कृष्ट -


 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ईटीव्ही भारतने राजस्थान मध्ये धडे गिरवण्या बाबत कारण विचारले असता त्यांनी खुलासा केला, आम्ही राजस्थानमध्ये शिक्षणाचे झालेले प्रयोग पाहण्यासाठी जात आहोत. मी स्वतः आणि शिक्षण विभाग देखील सोबत असणार आहे. आम्ही प्रथम जयपुर येथे जाणार आहोत जेथे शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य झालेलं आहे. आम्ही ते समजून घेणार आहोत. त्यानंतर चंदीगड, हरियाणा असा दौरा करून मग महाराष्ट्रात परतणार आहोत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणार आहोत. त्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरणार आहे.

महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे नाही राहिलं पाहिजे:

राजस्थानमध्ये जाण्याचं कारण असं की राजस्थानामधील सिक्कर-झुंझुनू व जयपूर हे असे जिल्हे आहेत जेथील सरकारी शाळा ह्या सर्वोत्तम श्रेणीमध्ये गणल्या जातात.

 केंद्र सरकारच्या 2020 च्या शालेय शिक्षणा संदर्भात अहवालात राजस्थान देशात प्रथम क्रमांकावर होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिक्षण विभाग तेथून धडे गिरवून आल्यानंतर राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विषमता किती दूर करतात, राज्याला गुणात्मक दृष्ट्या किती प्रगतीपथावर नेतात, हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र त्यासाठी शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ञांनी यांना यावर लक्ष ठेवावंच लागणार.



शिक्षकांनी आता आवाज बुलंद केलाय ...✊

 *शिक्षकांनी आता आवाज बुलंद केलाय ...✊*


नांदेड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये दोन पत्रकार शिक्षक बांधवाकडून निधी मिळविण्यासाठी गेले होते. वास्तविक शिक्षक अशा परिस्थितीत काम करतात की अनेकदा विद्यार्थ्यांना वही पेन या प्राथमिक शैक्षणिक साहित्याची ही कमतरता असते. तेव्हा अनेक शिक्षक अशा विद्यार्थ्यांना या साहित्याची मदत करतात.

     हा विषय वास्तविक व्यक्त करण्याचा नसून पण आज समाजात जे काही शिंतोडे शिक्षकांवर उडविल्या जात आहे ते पाहून नक्कीच हा काळ सावित्रीबाईंना ज्याप्रमाणे त्या काळात त्रास सहन करून स्त्री शिक्षण या देशात सुरू  केले जणू तिच व्यवस्था शिक्षणांस धारेवर धरु पहात आहे का? 

शिक्षकाचे कार्य हे कोणत्या मोजपट्टीत मोजता येत नसून ते केवळ प्रगत समाजाच्या प्रतिबिंबात झळकून येथे. आजचा समाज जो काही प्रगत दिसून येतो तेच या सामाजिक अभियंत्याचे नवनिर्माण असून याचे कुठलेच एमबी किंवा आॕडीट कधीच होऊ शकत. शिक्षक देशाचा खरंतर मुख्य  स्तंभ आहे. परंतू त्यास या राजकीय व्यवस्थेने पायमल्ली करण्याचे काम केलेले आहे.

   लोकप्रतिनिधी मुख्यालय  राहणे शिक्षकांना अत्यावश्यक सेवा नसतांना एकूणच अपमानकारक शब्द वापरून संपूर्ण शिक्षकांवर लगाम लावण्याची भाषा करतात.  

    नांदेड जिल्ह्यात नेमके कायच घडले हे खालील व्हिडीओ  मध्ये पहा....




https://youtu.be/RLyKx79__Fg

भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन... किरण भावठाणकर यांच्या लेखणीतून

 मॅकोलेप्रणित शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी लादल्याने पारंपरिक भारतीय शिक्षण व्यवस्थेचे न भरुन निघणारे असे नुकसान तर झालेच. पण, दुर्देव असे की, स्वातंत्र्योत्तर कालखंडातही शिक्षण पद्धती मुळापासून बदलण्याचे प्रयत्न सरकारकडून झाले नाही.



आता 'राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020' मुळे मात्र शिक्षणक्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सिंहावलोकन करणारा हा लेख...

रुदेव रविंद्रनाथ टागोर म्हणतात,'"Highest education is that which does not merely give us information but makes our life in harmony with all existence.' जे. कृष्णमूर्ती म्हणतात की, जीवनाचे समग्र आणि एकात्म दर्शन ज्याच्याद्वारे घडू शकते तेच खरे शिक्षण!


शिक्षण पद्धतीमध्ये पठण, मनन व चिंतन अशा बाबींना अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही देशाच्या शिक्षणपद्धतीवर त्या देशातील धार्मिकतेचा, संहितेचा, वातावरणाचा खूप मोठा पगडा असतो. 19व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आपल्या देशात गुरुकुल पद्धतीचा अवलंब होत असे. अर्थात, ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली होती. कालानुरुप त्यात आवश्यक ते बदल होत गेले. साधारणत: वयाच्या सातव्या वर्षापासून या शिष्याची गुरुगृही पाठवणी होत असे. गुरुच्या घरी राहून त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांना राहावे लागे.

घरातील पडेल ती कामे करून गुरुकडून विद्या ग्रहण केली जाई. कुटुंबातील एक सदस्य म्हणून राहात असल्याने साहजिकच घरातील सर्वच कामे करावी लागत. झाडझूड, धुणीभांडी, बाजारहाट इत्यादी कामांमध्ये त्याने सहभाग नोंदवावा, हे अपेक्षित असे. व्यक्तित्व विकासाच्या दृष्टीने हे ईष्ट ठरत असे. उच्च-नीच, श्रीमंत- गरीब असा भेदभाव नसल्याने त्यांची मानसिक, अध्यात्मिक व शारीरिक जडणघडण व्यवस्थित होत असे आणि याव्यतिरिक्त विविध विषयांतील शिक्षण गुरुंकडून मिळे.

साधारणत: 12 वर्षे हे शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडे व नंतर यथायोग्य गुरुदक्षिणा तो गुरुंना देत असे. त्यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात यथायोग्य योगदान दिले जाई. धार्मिक, बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांना कार्य करण्याची संधी मिळे. गुरुगृही राहून केलेला विद्याभ्यास, शास्त्राभ्यास, योगाभ्यास व शस्त्राभ्यास हा व्यक्तिगत आणि समाजाच्या उन्नतीसाठी कारणीभूत ठरे.

साधारणत: 16व्या शतकापासून विज्ञानक्षेत्रात बर्याृपैकी संशोधन सुरू झाले होते. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक अवस्थेतून बाहेर पडून त्यास विशिष्ट आकार येण्यास सुरुवात झाली. भारतीय शिक्षण पद्धतीवर भारतीय जीवन पद्धतीचा खूप मोठा प्रभाव होता. अनेक विद्वान, पंडित, शास्त्रकार यांच्या पुढे भारतीय संस्कृती ही पुष्ठ, प्रबळ आणि संस्कारी बनली होती. इंग्रज अधिकारी आणि वरिष्ठ यांनी या सर्व प्रक्रियेचा व्यवस्थित अभ्यास करून भारतीयांवर वर्चस्व गाजविण्यासाठी त्यांची शिक्षण पद्धती मोडकळीस आणणे आवश्यक आहे, हे जाणले होते.

त्यानुसार आपण भारतीयांना पाहिजे तसे वागवू, हे धूर्त इंग्रजांनी जाणले. इंग्रज राजवटीचा पगडा भारतीय जीवन पद्धतीवर पडला आणि साहजिकच शिक्षण पद्धतीवर त्याचा परिणाम होऊ लागला. या योजनेचा प्रणेता होता मेकॉले. भारतीयत्व नाहीसे करून 'काळे इंग्रज' निर्माण करण्याचे खूप मोठे कुटील कारस्थान रचले गेले, हे आपण जाणतोच.

प्रस्तुत लेखाचा मुख्य विषय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शिक्षण क्षेत्रातील 75 वर्षांचे सिंहावलोकन करणे हा होय. स्वातंत्र्यपूर्व काळात अल्पावधीत मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीची पाळेमुळे खोलवर रुजली गेली होती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही मेकॉले शिक्षण पद्धती समूळ उखडण्यासाठी काही कालावधी जाणे आवश्यकच होते. या पद्धतीमध्ये व्यावसायिक शिक्षणापेक्षा केवळ पुस्तकी शिक्षण देण्याचा प्रघात सुरू झाला.

स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 'राष्ट्रीय शिक्षण' हे प्राधान्य क्रमाने होतेच. वास्तविक पाहता, गेल्या 75 वर्षांपासून म्हणजेच 20वे शतक ओलांडून 22 वर्षे झाली तरी अपेक्षित असणारे बदल, परिवर्तन हे पाहिजे तसे झाले नाही, असे मानावे लागेल. स्वातंत्र्योत्तर काळात गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या अनेक प्रतिकूल गोष्टी समूळ उखडणे हे म्हणावे तितके सोपे निश्चितच नव्हते. भारतीय संस्कृतीची ओळख पुनर्स्थापित करणे, हे प्रमुख उद्दिष्ट असावयास हवे होते. तसा प्रयत्न झालाही. परंतु, त्यांची अंमलबाजवणी पाहिजे तशी झाली नाही हे ही तितकेच खरे!

अगदीच स्वातंत्र्यानंतरचा आढावा घ्यायचा झाला, तर 1948 साली. डॉ. राधाकृष्णन आयोगाने नैतिक शिक्षणावर भर दिला, तर 1952-53 मध्ये मुदलियार आयोगाने नैतिक व अध्यात्मिक शिक्षणास प्राधान्य दिले. श्री. प्रकाश आयोगानेही याच गोष्टींवर भर दिला. 1964 साली. डॉ. गणपतसिंग कोठारी आयोगाने मात्र या गेल्या 16-17 वर्षांतील पूर्वीच्या आयोगांच्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी यांचा अभ्यास करून खूप आमूलाग्र बदल सुचविले. विज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड, त्यातून होणारा विकास आणि जीवनमूल्ये यांचा योग्य समन्वय घालण्यावर भर दिला.

वास्तविक पाहता आजवर सर्व शिक्षणतज्ज्ञांनी अनेक अपेक्षित आणि उपयुक्त अशाच सूचना दिल्या आहेत. परंतु जाणवते असे की, मेकॉलेचा पगडा हा अत्यंत तीव्र असल्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता तो बदलू शकला नाही, हे दुर्देव! यातील आकडेवारी, तांत्रिकता आपण बाजूला ठेवूनच काही गोष्टींचा उहापोह करूया.

आज आपण पाहतो की, पदवीधारक उदंड झाले. पण, परिणामशून्य या शिक्षण पद्धतीमुळे विद्वान पंडितांची संख्या वाढली. परंतु, या शिक्षितास राष्ट्रीय भावना, सामाजिक कर्तव्ये याबद्दलची जाणीवजागृती नाही, असे दिसून येते. भारतीय संस्कृतीबद्दल आदराची भावना जाणवत नाही. तसे पाहता जबाबदार राष्ट्रभक्त नागरिक हेच शिक्षणाचे मूळ आणि खरे उद्दिष्ट आहे.

स्त्रीशिक्षणाची सकारात्मक बाजू

प्रस्तुत लेखाचा उद्देश हा गेल्या 75 वर्षांचा आढावा घेणे हा आहे. त्यामुळे काय व कसे असले पाहिजे, या गोष्टीवर आपण भर दिलेला नाही. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रीशिक्षण! महात्मा फुले, महर्षी कर्वे इत्यादींच्या प्रयत्नाने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ती मात्र आज फोफावल्याचे दिसून येते. समाजाच्या सर्वच घटकांमध्ये स्त्रियांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असे म्हणण्यापेक्षा काकणभर सरसच अशी कामगिरी आज स्त्रियांच्या हातून होते आहे. प्रतिभाताई पाटील आणि नुकत्याच राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू या दोन महिला याचे द्योतक आहेत. उल्लेख करावयाचा झाला, तर महिला आणि त्यांनी पादाक्रांत केलेली क्षेत्रे सांगण्यास कित्येक पाने लागतील. विस्तारभयास्तव टाळूया. आज एकही क्षेत्र असे नाही की, ज्यात महिलांचे अस्तित्व नाही ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

जागतिक पातळीवर भारताचे स्थान यावर विचार केला, तर विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण या क्षेत्रात भारताचा दबदबा आहे. अनेक देशांतून भारतीय डॉक्टर्स, इंजिनिअर्स व कुशल कामगार/तंत्रज्ञान जगभर मागणी आहे. अवकाश क्षेत्रातसुद्धा भारताने भरीव प्रगती केली आहे. परंतु, राष्ट्रभक्ती अभावानेच आढळते. परदेशी विद्यापीठांमधून शिक्षण घेण्याची स्पर्धा वाढतेच आहे. 'दिव्याखाली अंधार' अशीच काहीशी ही अवस्था नव्हे काय? एक जबाबदार नागरिक म्हणून जे वर्तन अपेक्षित असते, त्याबाबतीत दुर्देवाने व्यस्त प्रमाण जाणवते.

मनुष्यनिर्माण हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट, परंतु व्यक्तिगत प्रगतीपुढे राष्ट्रीय प्रगती गौण मानली जात आहे. म्हणजेच शिक्षणाचा पाया हा सर्व बाजूंनी परिपूर्ण नसावा, असे वाटते. जयप्रकाश नारायण म्हणत, 'माणूस परग्रहावर जाऊ शकतो. पण, आपल्या ग्रहावर कसे राहावयाचे, हे शिकू शकत नाही.' भारतीय शिक्षणाचा विचार करता, अनेक त्रुटीही आढळतात. एक म्हणजे जीवन पद्धती आणि शिक्षण याचा सुयोग्य ताळमेळ असल्याचे दिसत नाही. मूल्यशिक्षणाचाही खूप अभाव दिसतो. शिक्षण क्षेत्रात राजकीय आणि सरकारीकरणाचा अनावश्यक पगडा असल्यामुळे त्याचे व्यापारीकरण झाले आहे.

ग्रामीण शिक्षण

ग्रामीण भागातील शिक्षणाबद्दलचे असणारे एकंदरीत औदासिन्य ही देखील तितकीच चिंतेची बाब आहे. आजही देशाच्या लोकसंख्येपैकी 65 ते 70 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यापैकी 85 टक्के ते 90 टक्के लोक कायमस्वरुपी ग्रामीण भागाचे रहिवासी असतात. त्यांना पूरक अशा बाबींचे शिक्षण मिळावयास हवे. त्यांचे जीवन, राहणीमान, संस्कृती व व्यवसाय यांची जवळीक असणारे शिक्षण त्यांना मिळणे आवश्यक आहे. आज दर्जेदार शिक्षण, भौतिक सुविधा या शहरी भागातील विद्यार्थ्यांनाच उपलब्ध होतात.

भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. कृषी क्षेत्रात भारताची भरीव प्रगती आहे, हे नाकारता येणार नाही. पण, त्यामध्ये गुंतलेले मनुष्यबळ अत्यल्प आहे. शिक्षणाच्या कागदी उपलब्धीवर भर दिला जात असल्याने कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणासाठी लागणारा प्रचंड खर्च हा सामान्यांचे डोळे पांढरे करणारा आहे. ग्रामीण भागातील उत्पन्न आणि क्रयशक्ती यांच्या मेळ घालता, त्या लोकांसाठी हे अशक्यप्राय असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैफल्याची जाणीव निर्माण होते. शेतीतून होणारे नगण्य उत्पन्न, त्यातून गरजांची पूर्तता होऊ शकत नाही आणि परिणामी आत्महत्या!

खरे पाहता, ग्रामीण भागातही अनेक बुद्धिमान विद्यार्थी आहेत. परंतु, त्यांच्यासाठी कोणत्याच सोयी उपलब्ध नसतात. ज्यांना शक्य आहे ते गाव सोडून, घरदार विकून शहरात येतात. पण, शहरात सर्वांनाच चांगले अनुभव येतात असे नाही. त्यामुळे 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांची होते.

त्याचबरोबर शासन स्तरावर शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा म्हणावा तसा सकारात्मक नाही. परंतु, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020च्या अनुषंगाने बर्याहपैकी चित्र पालटेल, अशी अपेक्षा आहे. सर्व नियोजनामध्ये केवळ तांत्रिकतेवर भर दिल्यामुळे आत्मारहित व भावनारहित शिक्षण पद्धती दिसून येते. भारतीय शिक्षण पद्धतीत हा दिखाऊपणा वाढल्याचे दिसते. भौतिक संपन्नतेत वाढ, प्रचंड जागा, टोलेजंग इमारती, आधुनिक साधनसामग्री, 'हाय-फाय' संस्कृती यामध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार संस्कृती इत्यादींच्या मागमूसही दिसत नाही. शिक्षण हासुद्धा एक व्यवसाय-उद्योग बनल्याचे दिसते. 'शिकवणी उद्योग' हा नवीन उद्योग सुरू झाला आहे. कोटा, लातूर या ठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

गुणवत्तेचे मोजमाप हे केवळ प्राप्त गुणांवर होत असल्यामुळे राष्ट्रभक्ती वगैरे गौण समजून व्यक्तिगत आर्थिक उन्नतीकडेच केवळ लक्ष दिले जाते, ही बाब चिंतेची आहे. टॅलेंट आहे, ते उद्योग जगतात वापरले जाते. त्यासाठी जबर मूल्य मोजले जाते. पण, यामध्ये समाजोन्नती, संस्कृती, बंधुत्व, भावना यास थारा नाही. परस्पर संबंध हे ही यांत्रिक-रोबोटिक बनत असल्याचे दिसते. त्यामुळे आर्थिक संपन्नतेच्या आधारे उच्चभ्रू समाज आणि सर्वसामान्य यांच्यातील अंतर वाढून माणुसकीची भावना लोप पावत चालली आहे.

मागील उतार्याूत म्हटल्याप्रमाणे, शासन स्वयं अर्थसाहय्यित संस्थांना उत्तेजन देऊन स्वत:वरची जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे हा नवीन 'बिझनेस' सुरू होत आहे. सर्वच बाबींची उपलब्धी, पण आत्मारहित व भावनाशून्य! विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे भौतिकवादाचा भस्मासूर आपणा सर्वांना खाऊन टाकत आहे. भारतासहित अनेक विकसनशील व विकसित देशांमध्ये याची लागण झाली आहे. तरीपण अंधारवाटेमध्ये टिमटिमणार्याव दिव्याप्रमाणे अनेक संस्था आज काम करताना दिसतात. ही एक सकारात्मक बाजू आहे. परंतु, याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे त्याची परिणामकारकता ही दृष्य स्वरुपात समोर येत नाही.

शिक्षणाचे भारतीयीकरण

भारताला खूप प्राचीन असा इतिहास असल्यामुळे गेली कित्येक सहस्र वर्ष तिचा प्रसार-प्रचार संपूर्ण जगभर होत होता. परंतु, 19व्या शतकापासून हा पगडा समूळ नष्ट करण्यामध्ये इंग्रज काहीअंशी यशस्वी झाले, असेच दुदैवाने म्हणावे लागेल. मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीच्या दुदैवी फेरा गेल्या 75 वर्षांत कमी झालेला दिसत नाही. राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्राधान्यक्रमाने असलेल्या शिक्षणविषयक धोरणांना केवळ विरोध म्हणून गौण समजू लागले आहेत.हजारो वर्षे भारतीय शिक्षण संस्कृती व सभ्यता यांचा प्रभाव जगभर होता. म्हणजेच ते टिकाऊ होते, मग ते पुनर्स्थापित केले, तर अपेक्षित गोष्टी साध्य होतीलच ना!

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ इंदुमती काटदरे म्हणतात की, 'शिक्षणाचे भारतीयीकरण कशासाठी? शिक्षण भारतीयच हवे!' 'भारतीयीकरण' किंवा 'भारतीयत्व' याकडे अनेकजण पूर्वग्रह दुषित बुद्धीने पाहतात. वास्तविक पाहता भारतीयीकरण म्हणजे जुन्या बुरसटलेल्या कल्पना पुढे आणणे, धर्माचा विचार पुढे करणे, संस्कृत भाषेचाच वापर व विचार, विज्ञान-तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष आधुनिकतेकडे पाठ असे मुळीच नाही. याउलट एकेकाळी भारतीय शिक्षणाचाच बोलबाला सर्वत्र होता. ज्यामध्ये भारतीय संस्कृती, मानसशास्त्र, नीतीमूल्ये, विज्ञान विविध भाषेतीलल साहित्य, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास अपेक्षित आहे. सुरुवातील उल्लेख केल्याप्रमाणे अनेक शिक्षण आयोगांनी भारतीय अध्यात्माचा वारसा पुढे चालू ठेवण्यांसंबधी सूचना देण्याचे दिसते ते याचेच द्योतक नव्हे काय?

या लेखाला शब्दसंख्येचा संकोच असल्यामुळे हा खूप मोठा विषय असतानाही थोडक्यातच मांडणे इष्ट.

आता 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020'च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. गेल्या 75 वर्षांत अनेक आयोग स्थापन झाले. त्यात अनेक पूरक बाबी सूचविल्या गेल्या. परंतु, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर यात अपेक्षित बदल घडवून आणला जात आहे.

आपल्या शिक्षणाचा केंद्रबिंदू हा पाश्चिमात्य राष्ट्रांकडे झुकला होता, तो पुनर्स्थापित करण्याचे स्तुत्य प्रयत्न सुरु आहेत, ही चांगली बाब. 'जीडीपी'च्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करण्याचे सरकारने ठरविले आहे. अर्थात, यात वाढ हवी. केंद्र सरकारने पुरेसा निधी उपलब्ध केला, तर राज्य सरकारे त्याची अपेक्षित अंमलबजावणी करतील, अशी शक्यता दिसते. हा खूप विस्तृत विषय आहे. राज्य सरकारांनी आपला अभिनिवेश (राजकीय)बाजूला ठेवून देशाला वैभवाकडे नेण्यासाठी हातात हात घालून चालण्याची गरज आहे. 'सा विद्या या विमुक्तये' च्या उक्तीत अनुसरुन धोरण हवे.

भारतीयांची धर्मविषयक कल्पनेची सर्वसमावेशकता समजून घेऊन पुढे चालले पाहिजे. त्यासाठी यामागचे सोयीस्कर विकृतीकरण थांबणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महर्षी योगी अरविंद म्हणतात, 'भारतीय जीवन पद्धतीने मानवास संतोष दिला. तसेच, संयम पण शिकविला.' यातून भारतीयत्वांचे रुढीकरण होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शैक्षणिक प्रगतीचा बृहद् आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून पुढे आला आहेच. त्याच्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आपल्याला अपेक्षित प्रगती दिसेल व साधारण: 2030 -40 या दशकामध्ये त्याचे द़ृष्य स्वरुप पाहावयास मिळेल. तसेच, भारतीयत्वाची पुनर्स्थापना झाल्याचे दिसून येईल.

सर्वकाही चांगले होईल, अशी अपेक्षा करूया!

किरण भावठाणकर

आंतरजिल्हा बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

 🚨 *Transfer Portal Alert.*🚨


आंतरजिल्हा बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे 11 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता संपणार आहे.


तरी, सर्व अंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज उद्या संध्याकाळी 05.00 वाजेपूर्वीच बदली पोर्टल वर भरून घ्यावे.


*यापुढे मुदतवाढ अथवा Rejection - Correction ची संधी मिळणार नाही.*