राज्य शिक्षक पुरस्कारात वर्धा जिल्ह्याला स्थगिती....
क्रांतियोती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022-23 साठी निवड प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी राज्यातील शिक्षकांना राज्य गुणगौरव पुरस्कार दिला जातो. निवड समितीने निवड केलेल्या नावाला विरोध करीत न्यायालयात दाद मागण्यात आली असता न्यायालयाने या प्रक्रीयेलाच स्थगिती दिल्याने शिक्षकांचा 5 सप्टेंबर रोजी होणारा गुणगौरव कार्यक्रम होणार नाही.
शिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येक जिल्ह्यातून एका शिक्षकाची निवड केली जाते. शिक्षकाची निवड करण्यासाठी जिल्हा निवड
समितीकडून निवड प्रक्रिया राबवून प्रत्येक गटातून राज्य निवड समितीकडे तीन शिक्षकांच्या नावांची शिफारस केली जाते. यावर्षी वर्धा जिल्ह्यातून जिल्हा निवड समितीने निवड प्रक्रिया राबविताना शरद ढगे प्राथमिक शिक्षक यांना निवड प्रक्रियेत अपात्र ठरविले.
जिल्हा निवड समितीचा निर्णय अन्यायकारक असल्यामुळे ढगे यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. उच्च न्यायालयाने जिल्हा निवड समितीने ढगे अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. वर्धा जिल्हा प्राथमिक गटातून पुरस्कारासाठी केली जाणारी निवड पुढील आदेशापर्यंत करता येणार नाही.