'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?
श्याम नाडेकर यांच्या लेखणीतून
(लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर )
'तुम्हाला आम्ही पुरस्कार देतो, त्यासाठी तुम्हीच प्रस्ताव पाठवा', असे म्हणणे आणि प्रस्ताव पाठवल्यावरही 'छाटणी करून पुरस्कार देऊ', असा प्रकार करणे म्हणजे शिक्षकाचा आणि त्याच्या सेवेचा अपमानच नव्हे का? असाच काहीसा प्रकार 'आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीत होत असल्याची चर्चा शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्तुळात रंगायला लागली आहे.
शिक्षक दिनाच्या पर्वावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. मात्र, यासाठी स्वतः शिक्षकांना स्वतःच्या कार्याचा गवगवा करणारे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावे लागते.
केलेले अथवा करत असलेले उल्लेखनीय कार्य प्रखरतेने दिसत असताना, त्या कार्याची दखल स्वतः घेण्याऐवजी शिक्षकालाच स्वत:विषयी प्रस्ताव पाठवण्यास सांगणे, योग्य ठरते का? हा प्रकार म्हणजे, पुरस्कार भिकेमध्ये देण्यासारखे किंवा शासनाकडून खैरात वाटण्यासारखाच असल्याची खंत जिल्ह्यातील अनेक स्वाभिमानी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.