केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स 2.0 (पीजीआय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पीजीआय अहवालासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात संबधितांची लवकरात लवकर बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेयव्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे, ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे, असे विधान शरद पवार यांनी केलेले आहे.