डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

१० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

 पुणे – नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका (question papers)  घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली.



दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली असून ‘द बर्निंग’ टेम्पो थरार येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत हे टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ मधून भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याला येत होते. बुधवारी पहाटे टेम्पो चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर आला असता पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला.

मनीष चौरसिया व रामविलास राजपूत यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रयत्न अपुरे पडत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  घटनास्थळी दाखल झाले. 

त्यापाठोपाठ संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून नाशिक – पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे. पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्या टेम्पोला आग लागल्याचे समजताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

0 Comments:

टिप्पणी पोस्ट करा

याबाबत आपली काॕमेंट करा.