छ. संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकांची ६०० पदे कायमची संपुष्टात ?
गेल्या अनेक वर्षापासून राज्यात चर्चेत असलेला कमीपट संख्येच्या शाळेचा विषय आता वास्तविक कारवाई स्वरूपात मार्गी लागताना दिसत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ५९० शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएडधारक तरुणाची नेमणूक करण्यात येणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील ६०० पदे कायमचीच संपुष्टात येणार आहेत.
'आरटीई' नुसार कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते. पटसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत, अशी दुसरी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने 'समूह शाळा' हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, 'गाव तेथे शाळा' ही संकल्पना मोडीत निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. आता सेवानिवृत्त शिक्षकाबरोबरच डीएड-बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही यात कंत्राटी शिक्षक म्हणून संधी देण्यात येणार आहे.
नेमकी अशी होणार कार्यवाही ...
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर प्रत्येकी एक डीएड- बीएडधारक कंत्राटी तरुण-तरुणी किंवा सेवानिवृत्त शिक्षक घेण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. परंतु, सध्या कार्यरत शिक्षकांपैकी कोणत्या शिक्षकाला तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास निवड कोणाची कशा पद्धतीने करायची ? नियुक्तीचे अधिकार नेमके कोणाला ? यासंदर्भात संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील. त्यानुसार काही दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा