डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बहुसंख्य शाळांनी एप्रिल अखेरपर्यंत वर्ग भरवण्याचा निर्णय रद्द केला...

 ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे अशा शाळांना एप्रिल महिन्यापासून उन्हाळी सुट्टी घेण्यास परवानगी असल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर बहुसंख्य शाळांनी एप्रिलअखेरपर्यंत वर्ग भरवण्याचा निर्णय रद्द केला आहे.


शाळांचे वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने 24 मार्च रोजी एप्रिल महिन्यात शाळा घेण्याचा शासन निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी कमी होणार असल्याने पालक वर्गात नाराजी पसरली होती. अनेक शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करून वार्षिक परीक्षांचे नियोजन केले होते, मात्र या निर्णयामुळे आधीचे नियोजन रद्द करून पुन्हा वर्ग घ्यायचे का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे बंधन नसल्यामुळे अनेक शाळांनी एप्रिलअखेरपर्यंत वर्ग भरवण्याचा निर्णय रद्द केला आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला नसल्याने एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवून महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात वार्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या होत्या, मात्र या सूचना फार विलंबाने आल्या. तोवर शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करून वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक आखले होते. बऱयाच शाळांमध्ये परीक्षा सुरूदेखील झाल्या होत्या. आता हे नियोजन रद्द करून पुन्हा वर्ग घ्यायचे का, असा प्रश्न शाळांसमोर होता. मात्र यावर शिक्षण आयुक्तांनी खुलासा करीत ज्या शाळांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे अशाच शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहतील, असे स्पष्ट केले. मात्र या निर्णयाचा फायदा बहुसंख्य शाळा घेत असून सर्वच शाळांमध्ये एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ापासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात होणार आहे.

एप्रिलमधील वर्गांचे नियोजन नाही

एप्रिलमधील शाळा भरविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने फार उशिरा जाहीर केल्या . मुंबईतील बऱयाच शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करून वार्षिक परीक्षा घेण्यास सुरुवात केली, असे शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी सांगितले. मुंबईत आठवीपासूनच्या शाळा यापूर्वीच सुरू झाल्याने शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला. आता त्याआधारेच वार्षिक परीक्षा होत असून एप्रिलमध्ये परीक्षेनंतर वर्ग सुरू ठेवण्याचे कारण नसल्याने कोणतेही नियोजन केले नसल्याचेही ते म्हणाले.

सीबीएसई बोर्डाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासूनच अभ्यासक्रम सुरू करण्याची घाई असते. दुसऱया सत्रातदेखील ऑफलाइन वर्गांना फार कमी काळ मिळाल्याने शाळांनी कसा बसा अभ्यासक्रम पूर्ण करून वार्षिक परीक्षा घेतल्या आहेत. नववीच्या वार्षिक परीक्षा संपून त्यांचे दहावीचे वर्गदेखील सुरू झाले आहेत. त्याचबरोबर सीबीएसई बोर्डाच्या नवीन शैक्षणिक वर्षालादेखील आजपासून सुरुवात झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: