गेवराईत वेतनश्रेणीसाठी शिक्षकाकडून घेतले २,७०० रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला अटक
वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकाकडून २७०० रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २९) रंगेहाथ पकडले.
गेवराई पंचायत समितीत घडलेल्या घटनेप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई पंचायत समितीत लाचप्रकरणी कारवाईची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. भारत शेषेराव येडे (वय ५७, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मन्यारवाडी, ता. गेवराई) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
तक्रारदार शिक्षकाला चटोपाध्याय/ वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अटी व शर्तीनुसार मान्य झाले होते. संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे, असे पत्र काढले. त्यावरून तक्रारदार यांचे वरिष्ठ श्रेणीचे देयक तयार करून ते देयक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून व जिल्हा परिषदेतून मंजूर करून घेण्यासाठी २७ हजार रुपयांची रक्कम ठरली. प्राथमिक स्वरूपात या देयकाच्या १० टक्के रकमेची मुख्याध्यापकाने लाच म्हणून मागणी केली.
याबाबत शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व २७०० रुपये घेताना भारत येडे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.