द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवड झाली असून त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत.
त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.
स्थानिक राजकारण
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.[७]
ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.[८] २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या.[९] त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
राज्यपालपद
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.[१०][११] भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.
त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा